सद्गुरू वाचोनी नाम न ये हात | साधने साधीता कोटी गुणे ||१||
जैसा कांतेविन करणे संसार तैसा हा व्यवहार साधनाचा ||२||
जव सद्गुरू नाही केला भ्रतार | साधन विचार व्यर्थ गेला ||३||
नामदेव म्हणे सद्गुरू पासोनी | नाम घ्या जाणोनी नाना काही ||४||
Mycollection
Friday, June 26, 2015
सद्गुरू वाचोनी नाम न ये हात | साधने साधीता कोटी गुणे ||१||
Wednesday, June 10, 2015
भानुदास म्हणे
८
अनादि परब्रह्मा जें कां निजधाम । तें ही मूर्तिं मेघः श्याम विटेवरी ॥१॥
जें दुर्लभ तिहिं लोकां न कळे ब्रह्मादिकां । तपें पुंडलिका जोड़लेंसे ॥२॥
जयातें पहातं श्रुती परतल्या नेति नेति । ती हे परब्रह्मा मूर्तिं विटेवरी ॥३॥
वेदं मौन्य पड़े श्रुतीसी सांकड़े । वर्णितां कुवाड़ें पुरणांसी ॥४॥
ज्ञानियांचें ज्ञान मुनीजनांचे ध्यान । ते परब्रह्मा निधान विटेवरी ॥५॥
पुंडलिकाचे तपें जोडलासे ठेवा । भानुदास देवा सेवा मागे ॥६॥
९
अद्वय आनंद तो हा परमानंद । शोबहे सच्चिदानंद विटेवरी ॥१॥
सांवळें रूपडें गुणा आगोचर । उभा कटीं ठेऊनी विटे ॥२॥
पीतांबर परिधान चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥३॥
भानुदास म्हणे ब्रह्मा अगोचर । नेणवे विचार ब्रह्मादिकां ॥४॥
१०
वेदीं संगितलें श्रुतिं अनुवादिलें । तें ब्रह्मा कोंदलें पढंरीये ॥१॥
वाळंवंटीं बुंथीं श्रीविठठ्लनामें । सनकादिक प्रेमें गाती जया ॥२॥
भानुदास म्हणे तो हरि देखिला । हृदयीं सांठविला आनंदभरित ॥३॥
११
चंद्रभागेतीरीं उभा विटेवरी । विठ्ठल राज्य करी पंढरीये ॥१॥
ऋद्धिसिद्धि धृति वोळंगती परिवार । न साहती अवसर बह्मादिकां ॥२॥
सांडोनि तितुलें यथाबीजें केलें । कवणें चाळविलें कानडीयासी ॥३॥
उष्णोदक मार्जन सुगंधचर्चन । भीवरा चंदन पाट वाहे ॥४॥
रंभा तिलोत्तमा ऊर्वशी मेनिका । कामारी आणिका येती सर्वे ॥५॥
कनकाचे परयेंळीं रत्नाचे दीपक । सुंदर श्रीमुख ओवाळिती ॥६॥
संत भागवत सकळ पारुषले । निःशब्द होऊनि ठेले तुजविण ॥७॥
रुक्माबाई ती जाहलीसे उदार । पुंडलीअका कैसे पंडिले मौन ॥८॥
येसी तरी येई पंढरीच्या राया । अगा कृपावर्या पांडुरंगा ॥९॥
धन्य पंढरपूर विश्रांती माहेर । धन्य भीमातीर वाळुवंट ॥१०॥
भानुदास म्हणे चला आम्हांसवें । वाचा ऋन देव आठवावें ॥११॥
१२
जैसा उपनिषदंचा गाभा । तैसा विटेवरी उभा । अंगीचिया दिव्य प्रभा । धवळिलें विश्व ॥१॥
उगवती या सुरज्या । नवरत्नेंव बांधू पूजा । मुगुटीं भाव पैं दुजा । उपमा नाहीं ॥२॥
दोन्हीं कर कटीं । पीतांबर माळ गांठी । माळ वैजयंती कंठीं । कौस्तुंभ झळके ॥३॥
कल्पदुम छत्राकार । तळीं त्रिभंगीं बिढार । मुरली वाजवी मधुर । श्रुति अनुरागें ॥४॥
वेणुचेनि गोडपणें । पवन पांगुळला तेणें । तोही निवे एक गुणें । अमृतधारीं ॥५॥
अहो लेणियाचे लेणें । नादसुखासी पैं उणें । विश्व बोधिले येणें । गोपाळवेषें ॥६॥
पुंडलिकाचेनि भावें । श्रीविठ्ठला येणें नावें । भानुदास म्हणे दैवें । जोडले आम्हां ॥७॥
१३
शंख चक्र गदाधरु । कासे सुरंग पीतांबरु । चरणीं ब्रीदाचा तोडरु । असुरावरी काढितसे ॥१॥
बरवा बरवा केशिराजु । गरुडवहन चतुर्भूजु । कंठी कौस्तुभ झळके बिजु । मेघःशाम देखोनी ॥२॥
करी सृष्टिची रचना । नाभी जन्म चतुरानाना । जग हें वाखाणी मदना । तें लेंकरुं तयाचें ॥३॥
कमळा विलासली पायीं । आर्तं तुळशीचे ठायीं । ब्रह्मादिकां अवसरु नाहीं । तो यशोदे वोसंगा ॥४॥
उपमा द्यावी कवणे अंगा । चरणीं जन्मली पै गंगा । सोळा सहस्त्र संभोगा । नित्य न पुरती कामिनी ॥५॥
आधिष्ठान गोदातीरीं । श्रुद्धिसिद्धि तिष्ठती द्वारीं । भानुदास पूजा करी । वाक् पुष्पें अनुपम्य ॥६॥
१४
लावण्य रुपड़े पहा डोळेभरी । मूर्ति हे गोजिरी विटेवरी ॥१॥
राही रखुमाई सत्यभामा आई । गरुड हनुमंत ठायीं उभे असती ॥२॥
चंद्रभागा तीर्थ पुंडलीक मुनी । दक्षिणवाहिनी शोभतसे ॥३॥
वेणुनादीं काला गोपाळ करिती । भानुदासा तृप्ति पाहूनिया ॥४॥
१५
देखितांचि रूप विटेवरी गोजिरें । पाहतां साजिरें चरणकमळ ॥१॥
पाहतां पाहतां दृष्टीं धाये जेणें । वैकुंठीचें पेणें सहज हातीं ॥२॥
भानुदास म्हणे लावण्य पुतळा । देखियेल डोळा पांडुरंग ॥३॥
१६
चतुर्भुज मूर्ति लावण्य रुपड़े । पाहतां आवडे जीवा बहू ॥१॥
वैंजयंती माळा कीरीट कुंडलें । भुषण मिरवलें मकराकार ॥२॥
कासे सोनसळा पितांबर पिवळा । कस्तुरीचा टिळा शोभे माथे ॥३॥
शंख चक्र हातीं पद्म तें शोभलें । भानुदासें वंदिलें चरणकमळ ॥४॥
१७
गोंड साजिरें रूपस । उभा आहे हृषिकेश । योगी ध्याती जयास । तो हा सर्वेश साजिरा ॥१॥
रूप मंडीत सगुण । शंख चक्र पद्म जाण । गळा वैजयंती भूषण । पीतांबर मेखळा ॥२॥
कस्तुरी चंदनाचा टिळा । मस्तकीं मुकुट रेखिला । घवघवीत वनसावळा । नंदरायाचा नंदनु ॥३॥
हरूषे भानुदास नाचे । नाम गातसे सदा वाचे । प्रेम विठोबाचें । अंगीं वसे सर्वदा ॥४॥
१८
उन्मनीं समाधीं नाठवे मनासी । पहातां विठोबासी सुख बहु ॥१॥
आनंदाआनंद अवघा परमानंद । आनंदाचा कंद विठोबा दिसे ॥२॥
जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे । पाहतां साठवे रूप मनीं ॥३॥
नित्यता दिवाळी नित्यता दसरा । पाहतां साजिरा विठ्ठलदेव ॥४॥
भानुदास म्हणे विश्रांतींचें स्थान । विठ्ठल निधान सांपडलें ॥५॥
१९
जन्मोजन्मीं आम्हीं बहु पुण्य केलें । म्हणोनि विठ्ठलें कृपा केली ॥१॥
जन्मोनी संसारीं जाहलों त्यांचा दास । माझा तो विश्वाचा पांडुरंगीं ॥२॥
आणिका दैवता नेघे माझें चित्त । गोड गातां गीत विठोबाचें ॥३॥
भ्रमर मकरंदा मधासी ती माशी । तैसें या देवासी मन माझें ॥४॥
भानुदास म्हणे मज पंढरीची न्या रे । सुखें मिरवा रे विठोबासी ॥५॥
२०
आलों दृढ धरुनी जीवीं । तो गोसावी भेटला ॥१॥
जन्ममरण हरला पांग । तुटला लाग प्रपंच ॥२॥
इच्छा केली ती पावलों । धन्य जाहलों कृतकृत्य ॥३॥
भानुदास म्हणे देवा । घ्यावी सेवा जन्मोजन्मीं ॥४॥
२१
वेदशास्त्राचें सार । तो हा विठ्ठल विटेवर ॥१॥
पुढें शोभे चंद्रभागा । स्नाने उद्धार या जगा ॥२॥
पद्मतळें गोपाळपुर । भक्त आणि हरिहर ॥३॥
भानुदास जोडोनी हात । उभा समोर तिष्ठत ॥४॥
Savata mali abhang
संत सावता माळी यांचे अभंग
१.
ऐकावे विठ्ठल धुरे । विनंती माझी हो सत्वरें ॥ १ ॥
करी संसाराची बोहरी । इतुकें मागतों श्रीहरी ॥ २ ॥
कष्ट करितां जन्म गेला । तुझा विसर पडला ॥ ३ ॥
माळी सावता मागे संतान । देवा करी गा निःसंतान ॥ ४ ॥
२.
कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी । तुजविण दुसरी भक्ती नेणे ॥ १ ॥
दीन रंक पापी हीन माझी मती । सांभाळा श्रीपती अनाथनाथा ॥ २ ॥
आशा मोह माया लागलीसे पाठीं । काळ क्रोध दृष्टी पाहतसे ॥ ३ ॥
सावता म्हणे देवा नका ठेऊं येथें । उचलोनी अनंते नेई वेगीं ॥ ४ ॥
३.
कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥ १ ॥
लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी ॥ २ ॥
मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥ ३ ॥
सावता म्हणे केला मळा । विठ्ठल पायीं गोंविला गळा ॥ ४ ॥
४.
आमुची माळियाची जात । शेत लावूं बागाईत ॥ १ ॥
आह्मा हातीं मोट नाडा । पाणी जातें फुलवाडा ॥ २ ॥
शांति शेवंती फुलली । प्रेम जाई जुई व्याली ॥ ३ ॥
सावतानें केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ॥ ४ ॥
५.
नको तुझें ज्ञान नको तुझा मान । माझें आहे मन वेगळेची ॥ १ ॥
नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ति । मज आहे विश्रांती वेगळीच ॥ २ ॥
चरणीं ठेउनि माथा विनवितसे सावता । ऐका पंढरीनाथा विज्ञापणा ॥ ३ ॥
६
पैल पहाहो परब्रह्म भुललें । जगदीश कांहो परतंत्र झालें ॥ १ ॥
काया सुख केलें येणें नेणिजे कोण भाग्य गौळीयाचें वर्णिजे ॥ २ ॥
आदि अंतू नाहीं जया व्यापका । माया उखळी बांधिला देखा ॥ ३ ॥
सर्व सुखाचें सुख निर्मळ । कैसें दिसताहे श्रीमुखकमळ ॥ ४ ॥
योगियां ह्रदयमकळींचें हें निधान । दृष्टी लागे झणी उतरा निंबलोण ॥ ५ ॥
सावत्या स्वामी परब्रह्म पुतळा । तनुमनाची कुरवंडी ओंवाळा ॥ ६ ॥
७.
मागणें तें आह्मा नाहीं हो कोणासी । आठवावें संतासी हेंचि खरें ॥ १ ॥
पूर्ण भक्त आह्मां ते भक्ती दाविती । घडावी संगती तयाशींच ॥ २ ॥
सावता म्हणे कृपा करी नारायणा । देव तोचि जाणा असे मग ॥ ३ ॥
८.
भली केली हीन याति । नाही वाढली महंती ॥ १ ॥
जरी असतां ब्राह्मण जन्म । तरी हें अंगीं लागतें कर्म ॥ २ ॥
स्नान नाहीं संध्या नाहीं । याति कुळ संबंध नाहीं ॥ ३ ॥
सावता म्हणे हीन याती । कृपा करावी श्रीपती ॥ ४ ॥
९.
विकासिला नयन स्फुरण आलें बाहीं । दाटले ह्रदयीं करुणाभरितें ॥ १ ॥
जातां मार्गी भक्त सावता तो माळी । आला तया जवळी पांडुरंग ॥ २ ॥
नामा ज्ञानदेव राहिले बाहेरी । मळिया भीतरीं गेला देव ॥ ३ ॥
माथा ठेऊनि हात केला सावधान । दिलें आलिंगन चहूं भुजीं ॥ ४ ॥
चरणीं ठेऊनि माथा विनवितो सावता । बैसा पंढरीनाथा करीन पूजा ॥ ५ ॥
१०.
समयासी सादर व्हावें । देव ठेविले तैसें रहावें ॥धृ०॥
कोणे दिवशीं बसून हत्तीवर । कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।
कोणे दिवशीं पायांचा चाकर । चालून जावें ॥ १ ॥
कोणे दिवशीं बसून याचीं मन । कोणें दिवशीं घरांत नाहीं धान्य ।
कोणे दिवशीं द्रव्याचें सांठवण । कोठें साठवावें ॥ २ ॥
कोणे दिवशीं यम येती चालून । कोणे दिवशी प्राण जाती घेऊन ।
कोणे दिवशीं स्मशानीं जाऊन । एकटें रहावें ॥ ३ ॥
कोणे दिवशीं होईल सद्गुरूची कृपा । कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा ।
कोणें दिवशीं सावत्याच्या बापा । दर्शन द्यावें ॥ ४ ॥
११.
नामाचिया बळें न भीऊं सर्वथा । कळिकाळाच्या माथा सोटे मारूं ॥ १ ॥
वैकुंठीचा देव आणूं या कीर्तनीं । विठ्ठल गाऊनी नाचो रंगीं ॥ २ ॥
सुखाचा सोहळा करुनी दिवाळी । प्रेमें वनमाळी चित्तीं धरूं ॥ ३ ॥
सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा । तेणें भक्तिद्वार वोळंगती ॥ ४ ॥
१२.
उठोनी प्रातःकाळीं करूनियां स्नान । घालुनि आसन यथाविधी ॥ १ ॥
नवज्वरें देह जाहालासे संतप्त । परि मनीं आर्त विठोबाचें ॥ २ ॥
प्राणायाम करूनी कुंभक साधिला । वायु निरोधिला मूळ तत्त्वीं ॥ ३ ॥
शके बाराशें सत्रा शालिवाहन शक । मन्मथ नामक संवत्सर ॥ ४ ॥
ऋतु ग्रीष्म कृष्ण आषाढ चतुर्दशी । आला उदयासी सहस्त्र कर ॥ ५ ॥
सावता पांडुरंगीं स्वरूपीं मीनला । देह समर्पिला ज्याचा त्यासी ॥ ६ ॥
Tuesday, September 23, 2014
Sangit Sarita
कंठी राहो नाम। अंगी भरोनिया प्रेम॥
ऐसे ध्यावे काही दान। आलो पतित शरण॥
संतांचिये पायी। वेळोवेळा ठायी डोई॥
तुका म्हणे तरे। भवसिंधु एका सरे॥